Friday 30 January, 2009

जेव्हा साहेब दिघेसाहेबांवर चिडतात..

विधानसभेची १९९९ ची निवडणूक आजही आठवते. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. ठाणे जिल्ह्यातही कॉंग्रेस आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युती असा सामना चांगला रंगात आला होता. जिल्ह्यातील युतीचे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यावर सोपवण्यात आली होती. सुनियोजित तंत्र वापरून जिल्ह्यातून तेरापैकी आठ आमदार निवडून त्यांनी निवडून आणले होते.

या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पालघरच्या आमदार सौ. मनीषा निमकर यांच्या प्रचारासाठी आले होते. वेळ खूप कमी होता. राज्यात दौरे करून ते काहीसे थकले होते. मात्र, दिघे यांच्या आग्रहाखातर अगदी शेवटच्या टप्प्यात ते पालघरच्या सभेसाठी आले होते. अर्थात ते कसे आले, कसे "अडकले', याचा किस्सा खूपच गमतीदार आहे. बाळासाहेबांना तब्बल एक दिवस "कोंडून' ठेवण्याची हिंमत दिघे यांनी दाखविली होती. तो किस्सा असा घडला होता...

दिघे यांच्या हट्टापुढे बाळासाहेबांना माघार घ्यावी लागली होती. आपल्या पूर्वनियोजित जाहीर सभांना कात्री लावणे त्यांना भाग पडले होते. अखेर त्यांचा हिरवा कंदील मिळाला आणि पालघरसारख्या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात साहेब येणार, या वृत्तानेच वातावरण भारले गेले. शिवसैनिकांची एकच धावपळ सुरू झाली. ते कुठे थांबणार? त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचे काय? असे प्रश्‍न होते. परंतु दिघे असल्याने साहेब आणि शिवसैनिक तसे निर्धास्तच होते.

२५ मार्च १९९९ रोजी सांयकाळी शेकडो गाड्यांचा ताफा पालघरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नंडोरे या आदिवासी गावात घुसला. आजूबाजूला वस्तीही नव्हती. चिकूच्या वाडीत असलेल्या एका कॉंग्रेस नेत्याच्या बंगल्यात बाळासाहेबांची थांबण्याची व्यवस्था केली होती. बाळासाहेब पोचले आणि काही वेळात वीज गेली. विजेची पर्यायी कोणतीच सोय नव्हती. त्यातच बंगल्यातील नळाला पाणीच येईना. साहेब अस्वस्थ झाले होते. बाळासाहेब म्हणाले, "आनंद कुठे आहे?'

दिघे त्यांच्यासमोर हजर!
""काय रे! मला कुठे आणून ठेवले आहेस? मला काय हवे, काय नको, हे तुला माहीत नाही का?'' ते चिडले होते.
चुकलो! साहेब!

काय चुकलो म्हणतोस! सभेची तयारी झाली का? चला आता...

दिघे गप्पच. साहेबांना कळेच ना. ते प्रश्‍नार्थक नजरेने बघू लागले.

चल म्हणतोय ना... साहेब गुरकावलेच.

दिघे सावरून म्हणाले, ""साहेब! सभा उद्या संध्याकाळी आहे.''

काय? उद्या संध्याकाळी सभा? मग आज कशाला आणलेस?

साहेब भडकलेच. सभा उद्या असताना या खेड्यात मला उगीचच चोवीस तास अगोदर आणले आहे, यामुळे ते संतापाने थरथर कापू लागले. त्यांचा हा पवित्रा पाहून नजरेला नजर भिडवण्याची ताकदच कुणात राहिली नाही...

सुधीर (जोशी) कुठे आहे?

आलो, साहेब!

दिघे आणि जोशी यांची धारदार शब्दांत खरडपट्टी सुरू झाली. आपला संताप बाहेर काढल्यानंतर धुमसणारे बाळासाहेब शेवटी शांतपणे खुर्चीवर बसले. क्षणभरानंतर आपल्या नेपाळी सहायकास ते म्हणाले, "चल! आताच मुंबईला निघायचे.'

आवराआवर सुरू झाली. बाळासाहेब एक शब्दही न बोलता खुर्चीवर रेललेले.

दुसरीकडे दिघे हे जोशींना म्हणाले, ""भाऊ, काही करा; पण साहेबांना थांबवा!''

जोशी म्हणाले, ""आनंद, मी काही बोलणी खाणार नाही. तू असे केलेच का? आता तुझे तू बघ. त्यांना कोणी आता थांबवू शकणार नाही?''

दिघे म्हणाले, ""माझ्यासाठी शेवटचा प्रयत्न करा?''

शक्‍य नाही, बाबा! माझी हिंमत नाही, जोशींनी पुन्हा नकार दिला.

शेवटी मनाचा हिय्या करून दिघेच तोफेच्या तोंडी आले. बाळासाहेबांसमोर लवून पण नेटाने उभारले.
"हवं तर उद्याच मला शिवसेनेतून काढून टाका? पण तुम्ही जाऊ नका! ही सभा व्हायलाच हवी! एका आदिवासी महिलेचा प्रश्‍न आहे. साहेब! तुम्ही थांबलेच पाहिजे.''

पाच फूट उंच, डोळ्यांत तेज, दाढीवरून सतत हात फिरविणाऱ्या या छाव्याकडे सिंहाने जळजळीत नजर टाकली. डोळ्यांत संताप धुमसत होता; पण कुठे तरी राग शांत झाल्याच्या खुणा चेहऱ्यावर झळकत होत्या. त्यातच दिघेचे ते शब्द साद घालणारे होते. क्षणभर सुन्न शांतता होती. त्याचा भंग करीत बाळासाहेब बोलले.

"ठीक आहे, तू म्हणतोस तर थांबावेच लागेल!''

या शब्दांनी दिघेंवरील सर्व दडपण गळून पडले. सभा होणार, हे नक्की झालेले असते. साहेबांचे चरणस्पर्श करून त्यांनी लगेचच बंगला सोडला. फक्त एक तासाच्या सभेसाठी बाळासाहेब चोवीस थांबणार होते. त्यामुळे झालेली तगमग आपल्या "छाव्या'साठी बाळासाहेबांनी झेलली होती. दुसऱ्या दिवशी सभेला जनसागर लोटला. मनीषा निमकर दणदणीत मतांनी विजयी झाल्या.

बाळासाहेबांनी दिघे यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. दिघे शिवसेनेच्या वाटचालीतील अनेक घटनांचे साक्षीदार होते. धगधगती मशाल होती. गुंडगिरीबरोबरच समांतर सरकार राबवीत असल्याचा आरोप त्यांच्यावर नेहमीच झाला. त्यांची निष्ठा होती ती शिवसेनाप्रमुखांवर आणि शिवसेनेवर. मुक्त हस्ते मदत हाच त्यांचा धर्म होता. त्यांच्या "दरबारा'त म्हणूनच साधुसंताबरोबरच मुल्ला-मौलवी, पाद्रीही दिसत. चार खासदार, आठ-दहा आमदार निवडून आणण्याची ताकद ज्या माणसाकडे होती, ते दिघे आमदारच काय मंत्रीही झाले असते; परंतु आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांप्रमाणे एकच पद घेऊन शिवसेनेत जगले. ते पद होते शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख.
२७ जानेवारी हा आनंद दिघे यांचा स्मृतिदिन. बाळासाहेब आणि दिघे या दोन नेत्यांमधील असलेले विश्‍वासाचे नाते शेवटपर्यंत टिकून होते. त्याला उजळणी देणारा हा अनुभव होता...

* हा लेख ई-सकाळ मधून घेतलेला असून श्री. प्रकाश पाटील यांनी लिहिला आहे.

Friday 23 January, 2009

बाळासाहेब : बाबा आणि आईही!

हा विशेष लेख आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त उद्धवसाहेबांनी मटा साठी लिहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की तेजाचा गोळा... दरारा... करारी बाणा. मात्र याच्या उलट चित्र 'मातोश्री'मध्ये आम्ही अनुभवतो. कुटुंबवत्सल, प्रेमळ पिता, घरातल्या प्रत्येक सदस्याशी हितगुज साधणारा कुटुंबप्रमुख... असे एकापेक्षा एक अस्सल गुण आम्हाला 'मातोश्री'तल्या शिवसेनाप्रमुखांमध्ये पहायला मिळतात. आम्हा तिघा भावंडांना त्यांनी कधीही मारलं नाही. साधा हातही कधी उगारला नाही. त्यांना काय आवडते, त्यांना कशाचा राग येतो हे त्यांच्या वागण्यातूनच आम्ही ओळखायचो. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आयुष्यात सतत संघर्षालाच तोंड द्यावे लागले. तरीही, त्यांनी स्वभावात त्रागा येऊ दिला नाही. मात्र एखाद्या माणसावर अन्याय झाला की याच प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे रुपांतर रागात होते आणि त्याचे पडसाद त्यांच्या रागापेक्षा दसपटीने अधिक उमटतात. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात कुठून येते, हे आम्हालाही आजवर न उलगडलेलं कोडं आहे...

मी बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकायचो. आताच्या 'पालक दिना'चे 'फॅड' त्यावेळी नव्हते. मात्र व्यस्त असूनही साहेेबांचे आमचा अभ्यास, खेळातल्या कौशल्याकडे लक्ष असायचे. दादरचे आमचे जुने घर तळमजल्यावर होते. तिथेच मागच्या गॅलरीत साहेबांचा कॉम्प्रेसर आणि स्पे गन असायची. व्यंगचित्र काढताना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडायचे नाही. १९८५ नंतर शिवसेनेचा व्याप बराच वाढत गेल्याने व्यंगचित्रांसाठी लागणारा एकांत व मोकळा वेळ मिळणे दुरापास्त झाले आणि साहेबांनी कुंचला थांबवला. ..........

शिस्तप्रिय, काटेकोर दष्टा
साहेब जेवढे कणखर आणि निडर आहेत, तेवढेच ते हळवेही आहेत. 'माँ'च्या जाण्याने ते अधिकच हळवे बनले. आजही मी दौऱ्यावर जाताना ते मला जेवणाकडे आवर्जून लक्ष देण्यास सांगतात. 'वाटेल तसे दौरे करण्याचे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मला आता दिसतायत. तू तुझी काळजी घे', असाच त्यांचा सल्ला असतो. सभेच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांचा पहिला फोन येतो. सभा झाल्यानंतर 'कशी झाली' हेही ते आवर्जून विचारतात. परतताना सांभाळून निघ, सावकाश प्रवास कर, अशा सूचना करतात. 'माँ' गेल्यानंतर ते वडिलांबरोबरच आईचीही भूमिका बजावताहेत. साहेबांनी आम्ही तिघा भावंडांना खूपच प्रेम दिले. मात्र नातवंडांवरचे त्यांचे प्रेम पाहून आम्हालाही हेवा वाटतो. आजोबा आणि नातवंडांच्या बऱ्याच गप्पा रंगतात. साहेबांसारखाच तेजसलाही प्राण्यांविषयी खूप जिव्हाळा असल्याने त्यांचेही चांगलेच सूत जमलेय. साहेबांना प्राण्यांचा खूपच लळा. दादरला असताना आमच्याकडे मार्शल नावाचा ग्रेट डेन जातीचा कुत्रा होता. त्याला फिरवायला साहेब शिवाजी पार्कात जायचे.

साहेब अतिशय शिस्तप्रिय. टापटीपपणा हवाच. बैठकीसमोरचा टीपॉय व त्यावरच्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवलेल्या लागत. झुरळ सरळ चालले तर त्याला साहेब सोडतील, पण ते तिरके चालले तर चपलेने फटकारतील, असे प्रमोद नवलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते. हे उदाहरण फारच बोलके आहे. हा झाला गंमतीचा भाग, पण ते दैनंदिन जीवनातही फार काटेकोरपणे वागतात. दिलेली वेळ चुकवणे त्यांना खपत नसे. ठरलेल्या वेेळेआधी आपण एखाद्या ठिकाणी जातोय असे दिसले तर ते गाडी हळू करायला सांगत.

शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण तसे कमीच. सभा, दौरे सोडले तर स्वत:साठी फिरणं जवळजवळ नाहीच. 'माँ'च्या इच्छेखातर त्यांनी कर्जतला फार्म हाऊस बांधले. तेथे ते अधूनमधून जायचे. पण 'माँ'च्या निधनानंतर गेली कित्येक वषेर् ते तिथे गेलेलेच नाहीत. आतापर्यंत साहेबांनी एकदाच परदेश दौरा केलाय आणि तोही डिस्ने लँड पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. १९८० सालची ती गोष्ट. योगायोग म्हणजे त्यावेळी डिस्नेलँडचा रौप्यमहोत्सव होता. तेथे स्थानिक व्यंगचित्रकार आपले पटकन व्यंगचित्र काढून देतात. अशाच एकाची फिरकी घेण्याची साहेबांना लहर आली आणि त्याचाच कुंचला-कागद घेऊन साहेबांनी त्याचेच व्यंगचित्र काढून दिले! सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच व्यंगचित्रकार असून त्यातही लाजवाब राजकीय व्यंगचित्रे रेखाटणारा शिवसेनाप्रमुखांशिवाय दुसरा कोणी व्यंगचित्रकार असेल, असे मला तरी वाटत नाही.

साहेबांना 'फोटोसेशन'साठी तयार करणे हेही जिकीरीचे काम असे. एकदा गोव्याला असताना समुदाच्या पार्श्वभूमीवर साहेबांचे फोटो काढण्याचा मला मूड आला. पण साहेब समुदावर यायला उत्सुक नव्हते. 'चला तर खरं, इथल्या किनाऱ्याचे वेगळेपण तरी बघा', असे सांगत मी त्यांना तयार केले. हॉटेलच्या बग्गीतून साहेब किनाऱ्याजवळ आले. पण पाण्यात जायला तयार होईनात. शेवटी इथली वाळू बघा किती वेगळी आहे असे सांगत मी त्यांना पाण्यापाशी घेऊन आलो. 'काय आहे वेगळे?' असे म्हणत साहेबांनी दोन्ही हात आडवे पसरले आणि मी कॅमेरा क्लिक केला. विस्तीर्ण सागराच्या दिशेने बाहू पसरून उभे असलेल्या साहेबांचा तो फोटो माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक आहे.

साहेबांना छंद असे फारसे नाहीत. क्रिकेटवर मात्र त्यांचं निस्सिम प्रेम. चित्रपटांचं बोलाल तर आम्ही सर्वांनी मिळून थिएटरमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा होता 'सरकार'! आजही त्यांच्या उशाला पु. ल. देशपांडे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स असतात. वारंवार ऐकून त्या साहेबांच्या अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. बागकामाचीही त्यांना फार आवड. डॉ. बालाजी तांबे यांच्याकडे उपचारासाठी असताना साहेबांनी तर त्यांची बाग जवळजवळ नव्यानेच सजवून दिली होती. फार पूवीर् कधीतरी त्यांना एखादी डीश करायचा मूड येई. पण तिची 'रेसिपी' त्यांचीच असे!

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याचा बाळासाहेबांचा स्वभाव आहे. घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात. प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहणारे अनेक आहेत, मात्र प्रवाहाला थोपवून त्याचा मार्ग बदलण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये पहायला मिळते. शिवसेना बाळासाहेबांना जीवापेक्षाही प्यारी आहे. शिवसैनिक जसे बाळासाहेबांना पहायला वेडे असतात, तसेच बाळासाहेबही त्यांना पहायला वेडे असतात. दौऱ्यात रात्री अपरात्री प्रवास करायचा नाही, अशा खास शिवसैनिकांना साहेबांच्या सूचना असतात. दौऱ्यात शिवसैनिकाला दुखापत झाली की साहेब ताबडतोब होमियोपॅथीचे औषध द्यायचे. त्यांच्या घरच्यांचीही ते तेवढ्याच आस्थेने चौकशी करीत असतात. आजही दौऱ्यानंतर शिवसैनिक सुखरूप परतल्याची चौकशी ते माझ्याकडे करत असतात. शिवसैनिक हा आपल्या परिवारापैकीच एक आहे, असे ते मानतात. शिवसेनेसाठी बाळासाहेबांनी स्वत:च्या जिवाला कायमचा धोका पत्करला आहे.

घरी असले तरी आजही साहेब बदलत्या जगाच्या अपडेट्स ठेवून आहेत. ओबामांचा शपथविधीही त्यांनी संपूर्ण पाहिला. त्याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीही ते टीव्हीसमोर बसून होते. ती दृश्ये बघताना ते संतापाने धगधगत होते. या हल्ल्यानंतर आपल्या सरकारने पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट दौरा रद्द केला. त्या देशाबरोबरचे संबध तोडून आता कारवाई... प्रसंगी युद्धाची भाषा केली जातेय. मग साहेब त्यावेळी वेगळं काय सांगत होते? बांगलादेशी लोंढे आवरले पाहिजेत असे सध्याचे गृहमंत्री चिदंबरम आता बोलतायत. साहेब हे केव्हाच म्हणाले होते!..

बाळासाहेब दष्टे आहेत ते असे.

Thursday 1 January, 2009

लक्षात ठेवा २००९ सुरू झालेय!

सर्वप्रथम सर्वांना नविन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा! हे नविन वर्ष आपल्याला सुख-समृद्धी आणि भरभराटिचे जावो! हिच ''श्रीं'' चरणी प्रार्थना!

"एकच लक्ष्य'' हा ब्लॉग डिसेंबर २००७ ला सुरू केला. आदरणीय बाळासाहेबांनी केलेल्या "एकच लक्ष्य - विधानसभा २००९'' या आवाहनाचे वर्ष २००९ आज सुरू झालेले आहे. हे आपल्या सर्व शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाचे असे वर्ष असणार आहे. या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानस भेच्या निवडणूका होतील असे म्हटले जात आहे, म्हणजेच आपल्याकडे जीव ओतून काम करण्याचे आता केवळ ७-८ महिनेच उरलेले आहेत. जर या वेळात आपण आणखी मेहनत केली तर विधानसभा जिंकणे सोपे जाईल यात वादच नाही. साहेबांनी सांगितल्यानुसार शिवसेनेची एकहाती सत्ता म्हणजेच किमान १४५ आमदार निवडून आले पाहिजेत हेच लक्ष्य आपले सर्वांचे आहे आणि मा. उद्धवसाहेब यांच्या गरूडभरारीने हे लक्ष्य निश्चित जवळ येत आहे अशी खात्री वाटते.

तत्पूर्वी अतिशय महत्त्वाची अशा लोकसभेच्या निवडणूकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मागच्या साडेचार पेक्षा जास्त वर्षात काँग्रेसप्रणीत ''युपीए'' सरकारने देशाचे अक्षरशः वाटोळे लावण्याचे एककलमी कार्यक्रम हाती घेतलाय असेच वाटते. मनमोहनसिंग सारखा अर्थतज्ञ या देशाचा पंतप्रधान असूनही या सरकारला अर्थच नसल्यासारखे वाटते. सच्चर समितीच्या माध्यमातून असो किंवा ऑक्टोबर २००६ रोजी अफजलगुरूला सुप्रिम कोर्टाने सुनावलेली फाशी रद्द करण्याचे प्रयत्न असो मुस्लिम मतांचे राजकारण करण्यात या केंद्रसरकारने धन्यता मानली आहे. देशात जागोजागी होणार्‍या बॉम्बस्फोटाने देश हादरला पण गृहमंत्री बदलण्यापलिकडे यांची मजल गेलीच नाही. आताही पाकिस्तान एवढ्या धमक्या देत असतानाही आम्हाला युद्ध करायचे नाही. का? तर मुसलमान दुखावला जाईल! असेच ना!

१९९५ ते १९९९ या साडेचार वर्षात शिवसेना-भाजपा सरकारने विकासाची दिशा महाराष्ट्राला दाखवली. त्याचीच पुनरावृत्ती आता झाल्यास महाराष्ट्र पुन्हा नंबर एक वर येईल यात तिळमात्र शंका नाही. मुंबईत ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, साडेचार वर्षे जिवनावश्यक वस्तूंचे स्थिर भाव, कायदा आणि सुव्यवस्था तसेच स्थानिक आमदारांनी त्यांच्या विभागात चालविलेली धडाकेबाज कामे अश्या बर्‍याचशा गोष्टींमुळे युती सरकार ओळखले गेले. पण त्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील लोक एक मेगावॅट निर्माण न करताही मोफत विजेची अश्वासने देऊन निवडणूका जिंकल्या खर्‍या पण झाले काय? गेले आठ वर्ष महाराष्ट्र अंधारात बुडाला आहे, शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत गेला, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, विकासकामांना खीळ बसली तरीही मंत्र्यांची पोटांचा घेर वाढलेलाच!

मराठीच्या अस्मितेच्या नावाने आता बोंबा मारणारे एवढे वर्षे राजकारणात असूनही कुठे होते हा मराठी माणसाचा प्रश्न आहे. शिवसेना सत्तेत असताना सत्तेचा स्वार्थसाठी वापर करून वरून शिवसेनेच्या नावाने बोंबाबोंब करून मराठी माणसाला भडकविण्याचे कामच या लोकांनी हाती घेतले आहे. परंतु मराठी माणसाला हे पक्के माहित आहे कि जर शिवसेना नसती तर आज मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने जगणे केवळ मुश्किल होते. मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र आहे का असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा शिवसेना मराठी माणूस सर्वच क्षेत्रात पुढे कसा येईल याचा विचार करत होती. मराठी माणसाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळत नसताना आंदोलने करून तिथे मराठी माणूस उभा राहिला. भारतीय कामगार सेना, स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकर्‍यांमध्ये मराठी माणसावर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडून त्यांचे हक्क मिळवून दिले. ''वडापाव''च्या माध्यमातून रोजगार साखळी निर्माण केली त्यातून बर्‍याच मराठी कुटूंबांना आधार मिळाला. एवढे करूनही कोणी शिवसेनेवर आरोप करत असेल तर त्यासाठी मराठी माणसानेच शिवसेनेच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. शिवसेनेच्या नावाने पैसा कमावून कोणी मिल घेतल्या कोणी हॉटेल्स, पेट्रोल पंप घेतले आणि आणखी हाव सुटली तेव्हा बाहेर पडले.

मराठी माणसाची मते फोडून महाराष्ट्रात मराठी माणसाचे सरकार येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न महाराष्ट्र बनल्यापासूनच केले गेले आहेत आणि करत आहेत. आताचेही बेगडी मराठीप्रेमी मुंबई महानगरपालिकेवरील मराठी माणसाचा, शिवसेनेचा भगवा खाली खेचण्यासाठी काँग्रसी भैय्यासाठी (विरोधीपक्ष नेता राजहंस सिंग) थुंकी झेलायला तयार आहेत. एका तोंडाने मराठीच्या बाता करायच्या दुसर्‍या बाजूने मराठीच्या बोडक्यावर बसवण्यासाठी (किंवा सत्तेच्या लालसेपोटी म्हणू या) काँग्रेसी लांडग्यांना मदत करायची अशी ढोलकी बडवण्याचे एकंदर काम सुरू आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला काम करायचे आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली कामे पोहचवून, लोकांची कामे करून शिवसेनेला येत्या विधानसभेत किमान १४५ जागांवर विजयी करण्यासाठी आवाहन करायचेय. शिवसेनेचा फगवा फडकल्यास मराठी माणसाचे भले होईलच परंतु विकास कामांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला देशातील एक नंबरचे राज्य बनवायचे आहे.

"मराठी माणसा आपले मत शिवसेनेलाच दे तरच तुझ्या मताची किंमत होईल अन्यथा तेच तुझे मत महाराष्ट्राला पर्यायाने तुला अंधाराच्या खाईत घालायला कारणीभूत ठरेल एवढे लक्षात ठेव. हे वर्ष महाराष्ट्रासाठीही भरभराटीचे जाईल अशी आशा बाळगून या. विचार कर पुरता पक्का! शिवसेना विरोधकांना दे धक्का!''

जय हिंद! जय महाराष्ट्र!!