Monday 30 November, 2009

ज्यांनी दिला मान-सन्मान त्यांचाच केला अपमान!

हा लेख दिनांक ३० नोव्हेंबर २००९ च्या ’संध्याकाळ’ मध्ये रोहिणी खाडीलकर यांनी लिहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आणखी किती दु:ख सहन करावे लागणार? कोण जाणे! छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे केवळ महत्वाकांक्षा आणि मोहापायी शिवसेना सोडून गेले! त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि आता स्मिता ठाकरे यांची ’घुस’मट होत आहे. शिवसेनेने कॉंग्रेसवर कायम टिका केली! त्याच पक्षात प्रवेश करण्याचा विचार स्मिता ठाकरे करत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा वापरण्यासाठी आणि शिवसेनेतील दुखावलेली मने कॉंग्रेसकडे वळवण्यासाठी स्मिता ठाकरे यांचा उपयोग केला जाऊ शकतो. मनसेला दाबण्याकरीता स्मिता ठाकरे यांना पुढे केले जाऊ शकेल! हा राजकिय खेळच घाणेरडा व गलिच्छ आहे! पण राजकारण असेच असल्याने आम्ही राजकिय नेत्यांना दोष देत नाही!

मात्र आम्हाला आज अपार दु:ख होत आहे! कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे ठाकरे घराण्याचा नाव वापरून स्मिता ठाकरे यांनी बरेच काही मिळवले! मान-सन्मान, पैसा-प्रसिद्धीने पायावर लोळण घातली. या सर्व गोष्टींचा विसर पडणे व महत्वाकांक्षेच्या मोहाला बळी पडणे योग्य नाही!

शिवसेनेचे कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरेंकडे कसे आले?

शिवसेनाप्रमुख यांचा सर्वात मोठा मुलगा बिंदुमाधव ठाकरे यांचा अकाली अपघाताने मृत्यु झाला. या अपघातामुळे शिवसेनाप्रमुख हादरून गेले! अत्यंत कणखर भूमिका घेऊन, वाघाच्या ताकदीने गरूडाची झेप घेणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुलाच्या मृत्यूमुळे खचून गेले! आजही ’मातोश्री’ बंगल्यात जेथे तेथे मीनाताई ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरे यांच्या तसबीरी आहेत! इतक्या तसबीरी प्रत्येक भिंतीभिंतीला लावलेल्या आढळतील की, त्यांची गणतीच होणे अशक्य आहे! प्रत्येक तसबीर अत्यंत सुंदर, अत्यंत कलाकुसरीने तयार केलेली आहे! मुख्य दरवाजा उघडताच किमान सहा फूट उंचीची मुख्य तसबीर दिसते. या तसबीरीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या चेहऱ्यावर प्रकाश झळकतो! हा प्रकाश तसबीरीवर फेकण्यात आला नसून तो तसबीरीच्या मागून आपोआप उजळतो. ही तसबीर पाहिली कि, शिवसेनाप्रमुख व मीनाताई ठाकरे चालत आपल्याकडे येतात, असाच आभास होतो! मग आहे ती बिंदुमाधव ठाकरे यांची तसबीर! या तसबीरीमुळे दु:खाचा अंदाज येतो!

पहिला मुलगा मरण पावला आणि दुसरा मुलगा जयदेव ठाकरे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कधीही पटले नाही! त्यामुळे जयदेव ठाकरे यांनी ’मातोश्री’ बंगला सोडला. मात्र आपल्या वडीलांच्या इच्छेखातर त्यांनी कधीही निवडणूक लढविली नाही. असे म्हणतात की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे जयदेव ठाकरे गेले होते! राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात त्यांना प्रवेश हवा होता. पण शरद पवार यांनी आपल्या लाडक्या मित्राकरीता म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या करिता जयदेव ठाकरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश नाकारला. त्यानंतर जयदेव ठाकरे यांनी आपली राजकिय महत्वाकांक्षा कायमची बाजूला सारली!

या सुमारास जयदेव ठाकरे यांनी घटस्फोटाचा अर्ज केला! जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले आहेत. पहिली पत्नी जयश्री यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी स्मिता ठाकरे यांच्याशी विवाह केला! मग ’मातोश्री’ बंगला सोडल्यावर त्यांनी स्मिता ठाकरे यांच्या बरोबर असलेला आपला विवाह मोडायचे ठरवून पुन्हा घटस्फोटाचा अर्ज केला! जयदेव ठाकरे यांना समजविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला पण जयदेव ठाकरे ऐकायला तयार नव्हते. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्मिता ठाकरे यांना आधार दिला! स्मिता ठाकरे यांना ’मातोश्री’ मध्ये राहण्याची परवाणगी देण्यात आली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची लाडकी सुन म्हणून लोक स्मिता ठाकरे यांना ओळखायला लागले! पुढे निवडणूक हरल्यानंतर स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा रितसर घटस्फोट झाला! ज्यावेळी युतीचे सरकार सत्तेवर होते, तेव्हा मोठे-मोठे उद्योगपती, बिल्डर आणि नेतेमंडळी ’मातोश्री’वर ये-जा करीत असत. तेव्हा स्मिता ठाकरे यांची भेट घ्यावीच लागत असे! इतका मान आणि प्रतिष्ठा बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेमुळे त्यांना मिळाला होता! किंबहुना एका पंचतारांकित हॉटेलात साधी रिसेप्शनीस्टची नोकरी करणाऱ्या स्मिता ठाकरे यांना केवळ जयदेव ठाकरे यांच्याशी विवाह केल्यामुळे मान, पैसा व प्रसिद्धी मिळाली होती! त्याचा विसर कसा पडला?

स्मिता ठाकरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव नशिब आजमावून पाहण्याची इच्छा दर्शविली. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सुनेच्या इच्छेला मान दिला आणि ’हसिना मान जायेगी’ या चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटात संजय दत्त, करिश्मा कपूर, गोविंदा यांच्यासारखे सुपरस्टार होते! स्मिता ठाकरे यांनी अनेक कार्यक्रम, टिव्ही मालिका, चित्रपत इ. गोष्टीत रस घेतला. आणि आयोजनाची जबाबदारी पार पाडली. एकेकाळी चित्रपटसृष्टीत असा एकही मोठा कार्यक्रम नव्हता, जिथे स्मिता ठाकरे यांना आमंत्रण केले जात नव्हते! किंबहुना डिजायनर पेहरावात स्मिता ठाकरे वावरताना अनेकदा अनेकदा छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत! मोठ-मोठे स्टार्स आपापले प्रश्न घेऊन ’मातोश्री’वर ये-जा करीत असत. आणि त्याचा फायदा स्मिता ठाकरे यांना होत असे! आज या सर्व गोष्टींचा विसर स्मिता ठाकरे यांना का पडला?

बिंदुमाधव ठाकरे यांच्या मृत्यूनंतर मानसिकरित्या खचलेल्या शिवसेनाप्रमुख हे जयदेव ठाकरे यांच्या घर सोडल्यामुळे अधिकच दु:खी झाले! त्यांचा तिसरा मुलगा उद्धव ठाकरे हे मात्र सर्वकाळ शिवसेनाप्रमुखांबरोबरच होते. प्रत्येक दु:खातून सावरण्याकरिता उद्धव ठाकरेच पुढे धावले होते! त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनाप्रमुखांचा जास्त कल असणे स्वाभाविक आहे! उद्धव ठाकरे शांत स्वभावाचे असल्याने त्यांना शत्रू कमी आहेत! म्हणूनच शिवसेनाप्रमुख यांनी आपल्या शिवसेनेचे कार्याध्यक्षपद उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविले! तीघा मुलांपैकी एकटे उद्धव ठाकरेच ’मातोश्री’वर राहिले होते! त्यामुळे तसे म्हटले तर शिवसेनाप्रमुखांकडे चॉईसच नव्हता!

चित्रपटसृष्टीत वावरल्यानंतर स्मिता ठाकरे यांनी समाजसेवेत रस घेतला! ’मुक्ती फाऊंडेशन’ची स्थापना त्यांनीच केली. आज या फांऊंडेशनने बरेच काम केले आहे! एडससारख्या घातक रोगावर मात करण्यासाठी फाऊंडेशनने केलेले काम कौतुकास्पद आहे! मात्र एखादी नविन संस्था स्थापन करणे आणि संस्थेतर्फे भरभरून काम करण्यासाठी लागणारे भांडवल जमवणे महाकठीण आहे! हे भांडवल निव्वळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेमुळे ’मुक्ती फाऊंडेशन’कडे सहजी चालत आले होते. याची जाणीव स्मिता ठाकरे विसरल्या का?

भाजपा नेते आहेत कुठे?

शिवसेना-भाजप यांची युती आहे. भाजपाने नेहमी ’परिवार’ची भाषा केली! पण आज भाजपाने एकदाही धावत येऊन स्मिता ठाकरे यांना समजविण्याचा प्रयत्न केला नाही! परिवाराचा अर्थ हाच का? केंद्रात तुकडे-तुकडे पडलेला भाजप जिवंत राहण्यासाठी कसाबसा धडपडत आहे! भाजपाचे सर्वात जेष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांचे एक पाऊल जरी भाजपात असले तरी दुसरे पाऊल केव्हाच बाहेर पडले आहे! त्यांची स्वत:ची स्थिती अतिशय बिकट आहे. अशा परिस्थित ते स्मिता ठाकरे यांना काय समजवणार?

रविवारचा सुट्टीचा मजेचा दिवस अतिशय बेकार गेला! कारण त्यादिवशी प्रत्येक टिव्ही चॅनेलवर स्मिता ठाकरे यांच्या बंडखोरीचे वृत्त अधिक मसालेदार करून दाखविले जात होते! राज्यसभेवर जाण्याची स्मिता ठाकरे यांची इच्छा होती. पण त्यांच्याऐवजी भारतकुमार राऊत यांना राज्यसभेवर पाठविले गेले! खासदारकी गेली, मग आमदारकीही गेली म्हणून स्मिता ठाकरे नाराज झाल्या असे म्हणतात! आमदार अथवा खासदार होण्यासाठी अनेकजण ’मातोश्री’च्या पायऱ्या चढल्या असतील आणि त्यातील जवळजवळ सर्वांनी हजारोवेळा स्मिता ठाकरे यांना त्यावेळी मस्का मारला असेल! असे अनुभव आले असताना आमदारकी आणि खासदारकी इतकी म्हत्वाची कशी वाटते? आमदार होऊन किंवा खासदार होऊन जितका पैसा कमावणे शक्य आहे, त्याच्या अनेकपट अधिक पैसे त्यांनी कमविले असतील! साधी रिसेप्शनिस्ट असताना आज जुहू येथे स्वत:चा बंगला घेऊन स्मिता ठाकरे रहात आहेत! आमचे इतकेच म्हणणे आहे की, ज्यांनी हे सर्व दिले, ते आता थकले असताना त्यांच्या हृदयावर आणखी घाव घालू नयेत! आणखी किती घाव पचवायचे राहिले आहेत?

राजकिय खेळी बेकार!

कॉंग्रेसची विचित्र खेळी सुरू आहे! भाजपा स्वत:च्या कृत्यामुळे तुकडे तुकडे होऊन कोसळत आहे! डोलारा कोसळावा आणि भग्न अवस्थेतील राजवाडा तसाच उरावा, अशी भाजपाची परिस्थिती आहे! विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या पराजयामुळे शिवसेना पक्ष थकला आहे! लोकसभेत निव्वळ आठ जणांना निवडून आणता आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न भंग झाले आहे! अशा स्थितीत कॉंग्रेससारखा एकमेव शक्तिशाली पक्ष लोकांच्या नजरेसमोर आहे आणि याच शक्तिला लहान मोठे ठोसे देण्याची ताकद फक्त मनसे पक्षात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकिय पक्षाला भरपूर वाव मिळाला तो कॉंग्रेसमुळेच! युतीची मते गिळण्याचे काम मनसेमुळे झाले! पण आता मनसेची महत्वाकांक्षा वेळीच चेपण्यासाठी स्मिता ठाकरे यांचा उपयोग इस्पिकच्या एक्क्याप्रमाणे होणार आहे! ठाकरे घराण्याची अत्यंत लाडकी-गाजलेली, सुप्रसिद्ध व हुशार सुन जर कॉंग्रेसकडे आली, तर मराठी माणसाची तुटलेली मने स्मिता ठाकरे यांच्या मार्गाने कॉंग्रेसकडे वळतील! या बहुमुल्य कामगिरीसाठी स्मिता ठाकरे यांची खासदार किंवा आमदार होण्याचे स्वप्न कॉंग्रेस नक्कीच पुर्ण करेल! म्हणूनच आम्ही खुले आम आमचे स्वत:चे मत व्यक्त करू इच्छित आहोत. दुसऱ्याच्या हातातले खेळणे होण्यापेक्षा स्वताच्या मर्जीने स्वत:चा मान-सन्मान ठेवून घराण्याची मर्यादा राखणे अधिक चांगले!

एकेकाळी केवळ स्मिता ठाकरे यांनी वारंवार सांगितल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाकरिता नारायण राणे यांच्या नावाचा विचार केला होता! मनोहर जोशी यांचा राजिनामा घेऊन नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते! आज नारायण राणे कॉंग्रेसमध्ये आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी भरपूर धडपडत आहेत! तथापि कॉंग्रेसमध्ये ४० ते ६० वर्षे कॉंग्रेसची सेवा केलेले नेते असताना बंडखोरी केलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद कसे द्यायचे? असा सवाल पुढे आला त्यामुळे नारायण राणे यांना आजवर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. हे चित्र डोळ्यासमोर असताना स्मिता ठाकरे यांना त्यांची राजकिय महत्वाकांक्षा कॉंग्रेसपक्षात जाऊन पूर्ण होईल, असे कसे काय वाटेल? विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, जयंत पाटील... इतक्या दिग्गजांना ओलांडून त्या मुख्यमंत्री होऊ शकतील का?

तेव्हा सर्व खेळ उघड आहे! राज ठाकरे यांची शक्ती खच्ची करण्याकरिता स्मिता ठाकरे यांचे हत्यार पुढे करण्यात येत आहे! राज ठाकरे यांच्या मदतीने युतीला धक्का देण्यात आला आणि स्मिता ठाकरे यांची मदत घेऊन पुन्हा तोच खेळ खेळला जात आहे!!

मराठी अस्मितेचा पता वापरला जाणार आहे! महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, "जर स्मिता ठाकरे यांना कॉंग्रेसचा विचार प्रवाह मान्य असेल तर आम्ही कोणतीही हरकत घेणार नाही. मात्र त्यांच्यासाठी खास गालिचा अंथरला जाणार नाही!" याचा अर्थ काय? माणिकराव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेत सारे काही आले नाही का?

भाजपाने पूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या गांधी-नेहरू घराण्याला छळण्याकरिता मनेका गांधी यांना पुढे करून सोनियावर मात करण्याचा प्रयत्न केला होता! राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढायला लागताच वरूण गांधी यांचा प्रचार करून त्यांना पुढे आणले होते. मनेका गांधी आणि वरूण गांधी यांच्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भरपू दु:ख सहन करावे लागले आहे! आज काहिसा तसाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे! जर घराण्याच्या शक्तिविरोधात लढता येत नसेल तर घराण्यातील एखाद्या व्यक्तिला बाजूला करून याचेच हत्यार बनविले जाते!