Friday 18 June, 2010

दहावी निकाल मदत केंद्राला भरघोस प्रतिसाद


यंदा दहावीचा निकाल इंटरनेटवरुन जाहिर होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होणार हे स्पष्टच होते. शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घेतल्याचे आजच्या अनुभवावरुन लक्षात आले. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या बाळासाहेबांच्या सुत्रानुसार आणि वरील होणारी गैरसोय पाहता हे मदत केंद्र सुरु करण्याचे ठरले  आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रचंड गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या माध्यमातून करता आल्याने खुपच समाधान वाटले.

बारावीप्रमाणेच दहावीचा निकाल सुद्धा प्रथम इंटरनेटवरुन जाहिर करून त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष निकालाची प्रत मिळणार असल्याचे बोर्डाने जाहिर केले. यामुळे सर्वात जास्त गैरसोय राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणार होती. हे निकाल शासनाच्या महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात पाहण्याची सोय शासनाने केली होती. परंतु एका वृत्तपत्रात कोकणाची आकडेवारी आली होती ती अशी, कोकणातील चार जिल्ह्यांत एकूण १३८० तलाठी व ४७ तहसिलदार असून त्यांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाच नाही. नव्हे कोकणातील या चार जिल्ह्यात अजून इंटरनेटची सोयच नाही. तर मग शासनवरील आदेश काढून काय करणार होते?

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेच्या मदत केंद्राचा आजच्या संपूर्ण दिवसात एकूण ३०८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. बहुसंख्य विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनच फोन करत होते. निकाल केवळ एका फोन कॉलवर मिळत असल्यामुळे अनेक जणांनी शिवसेनेचे आभार सुद्धा मानले आणि भविष्यात असेच काम करत राहाल अशी इच्छाही व्यक्त केली. 

शिव माहिती व तंत्रज्ञान सेनेने सर्वात प्रथम बारावीसाठी असेच मदत केंद्र सुरु केले आणि आता दहावीसाठी! भविष्यात सुद्धा शिव माहिती व तंत्रज्ञान सेना अशा प्रकारच्या कामात नक्कीच पुढाकार घेईल. आजच्या या कामात शिवसेना ऑर्कुट समुदायावरील प्रत्यक्ष सहभागी आणि अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या शिवसैनिकांचा हातभार लागला तो खुपच मोलाचा होता. अशा सर्व शिवसैनिकांचे आभार!

Saturday 12 June, 2010

राज ठाकरे यांनी केले स्वत:चेच वस्त्रहरण!

परवाच्या विधानपरिषद निवडणूकांमध्ये कॉंग्रेस- राष्ट्रवादीला मदत (पैसे घेतले पण आपण तिला मदतच म्हणू यात) करून टिकेचे धनी ठरलेले मनसे (धनसे)प्रमुख आज अक्षरश: बिथरुन गेले. कालच्या ईसकाळच्या अंकातील मराठी माणसांच्या काही प्रतिक्रिया सामना मध्ये आल्याने राज ठाकरे यांचा पारा चढला आणि आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. अक्षरश: बावचलेल्या अवस्थेत आजची त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यात काय बोलले तर मागच्या वेळचीच टेप पुन्हा वाजवली. यात नविन असे काहिच नव्हते. 

शिवसेनेने अमराठी लोकांना खासदार करण्यापासून ते मराठी भारतकुमार राऊत आणि निलम गोऱ्हेपर्यंत घसरले. मुळात आज त्यांची गाडी रुळावरून चालतच नव्हती. पत्रकारांनी टाकलेल्या बाऊंसर वर अक्षरश: लोटांगण घातले. तेच तेच रटाळ बोलताना काही खऱ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. माझे आमदार विधानसभेत आले पाहिजेत म्हणुन कॉंग्रेसला मदत केल्याचे सुद्धा सांगितले. तसेच महानगरपालिकेत सपा शिवसेनेला मदत कशी करते हे सुद्धा सांगायला विसरले नाही.

मुळात यांचे आमदार निलंबीत झालेच का? सर्व मराठी माणसांना माहिती आहे. त्याचा बराचसा गाजावाजा खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे. मराठी अस्मितेसाठी माझे आमदार हौतात्म्य सुद्धा पत्करायला तयार आहेत, मग परवा काय तुमच्या या आमदारांच्या मांजरी झाल्या का? लोकांच्या कामांची इतकी काळजी तुम्हाला त्यावेळी होती का? ज्या मराठी माणसांनी तुमच्या आमदारांना निवडून दिले त्या मराठी माणसांच्या मताची जाणिव तेव्हा नाही झाली? मुळात आता तर ते प्रकरण सुद्धा बनाव वाटायला लागले आहे. तु मारल्यासारखा कर मी लागल्यासारखा करतो. हिच तुमची भूमिका. मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड प्रसिद्धी कमवायची आणि 
मराठी माणसालाच फाट्यावर मारायचे हे तुमचे उद्योग काही नविन नाहीत.

परवाच्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचा एक आमदार हरला याचे दु:ख नक्कीच आहे. एक आमदार शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा होता. पण ते होऊ शकले नाही. यासाठी तुमचा मनसे पक्ष जबाबदार आहे असे  मुळीच म्हणणे नाही. तुमचा स्वत:चा पक्ष आहे काय निर्णय घ्यायचे याचाही तुम्हाला अधिकार आहे. पण प्रत्येल वेळेस जे तुम्ही म्हणायचात की या सगळ्या युती-आघाड्यांसारखे मला राजकारण करायचे नाही. माझा पक्ष यांच्यापेक्षा वेगळा आहे. आता तुमचे काय म्हणणे आहे? ते तुम्ही लोकांना सांगितलातच नाहीत. खरेतर आजच्या पत्रकार परिषद हि तुमच्या शिवसेना काविळीचे एक उदाहरणच आहे. शिवसेनेला पराभव पचवता येत नसेलही पण ज्या मराठी मातीशी कॉंग्रेस सतत बेईमानाने वागते त्यांच्या कळपात जाऊन तुम्ही काय मोठे काम केलेत हो?

विधानपरिषदेत यापूर्वी अनेक मोठे लोक बिनविरोध निवडून जायचे. लेखक, कवी, गायक आणि इतर वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोक याच सभागृहाचे आमदार झालेले आहेत. पण आजच्या खाव सुटलेल्या जमान्यात ते चित्र दिसणे केवळ अशक्य आहे. पैशाच्या थैली समोर टाकल्या की राजकारणात सगळे काही मिळते. अशा प्रकारच्या निवडणूकीत घोडेबाजार (की गाढव) होतो हे सगळ्यांना माहित आहे. तरीही राज ठाकरे म्हणत आहेत की केवळ चार आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी आम्हि आघाडीला मतदान केले. पण परवाच तुमचे गटनेते टीव्ही वर हेच सांगायला का कचरत होते? 

राज ठाकरे आज तुम्हीच जगासमोर उघडे झाला आहात! सर्वजण असेच समजत होते की तुम्ही काहितरी वेगळे करत आहात? अर्थात ती गैरसमज दुर तुम्हीच आज केलात ते बरे झाले. शिवसेनेवर टिका केल्यामुळे तुमचा पक्ष एवढा मोठा होऊ शकते म्हणजेच शिवसेनेला किती महत्व आहे तेच बघा. तुम्ही स्वत: आज ज्या उड्या मारत आहात त्या सुद्धा शिवसेनेमुळेच! आज उद्धवसाहेबांनी सांगितलेच आहे जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा!