साम मराठी' वाहिनीच्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पत्रकार राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. त्यातील काही अंश...
राजू परुळेकर - राज्यापुढील अक्राळविक्राळ समस्या सोडविणे सोपे नाही, असे वाटते का, की समस्या ही एक संधी आहे, असे वाटते?
उद्धव ठाकरे - समाजसुधारणा, इतिहास, राजकारण, प्रबोधन कोणत्याही क्षेत्रात संपन्न अशी माणसे राज्याने दिली आहेत. अशी परंपरा असलेले राज्य दिवसागणिक मागे पडताना पाहून अंतःकरण तीळतीळ तुटते. या समस्या सुटू शकतच नाही का? या समस्या निर्माण कशा झाल्या? विरोधक म्हणून मला आगपाखड करावयाची नाही; पण प्राधान्याने गुन्हेगार कोण असतील, तर ते राज्यकर्ते आहेत.
युतीसह सर्व राज्यकर्ते जबाबदार आहेत?
युतीच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्याआधी व नंतरही एवढी कामे झाली नाहीत. गेली ८-९ वर्षे आघाडीचे सरकार आहे व विजेचे संकट खूप मोठे आहे. मी सिन्नरला गेलो होतो, तेव्हा एका शेतकऱ्याने सांगितले, की चार दिवस झाले आमच्याकडे वीजच आलेली नाही.
एन्रॉन प्रकल्प अरबी समुद्रात बुडविण्याची चूक युतीने केली. हे कारण वीजसंकटामागे आहे का?
एन्रॉन हा एकमेव प्रकल्प राज्यासाठी आहे का? दुसरे कोणतेच प्रकल्प दिसत नाहीत? एन्रॉनमुळे किती वीज राज्याला मिळणार आहे? आम्ही काय केले? तो आम्ही बंद पाडला नाही. आधीच्या सरकारने जो करार केला होता, त्यातील राज्याला वाईट, अहितकारक गोष्टी आम्ही बदलून घेतल्या. एन्रॉनकडे बोट दाखवून सरकारला पापातून सुटका करून घेता येणार नाही. गेल्या ९ वर्षांत इतर किती प्रकल्प सरकारने आणले व वीजनिर्मिती केली?
शिवसेनाप्रमुखांबरोबर काम केलेल्या नेत्यांची पिढी आता उरली नाही, तर काही नेत्यांनी शिवसेना सोडली. सत्ता मिळाल्यावर शिवसेनेकडे चांगला प्रशासकीय अनुभव असलेले किती नेते आहेत?
शिवसेनेला आपण प्रबळ पक्ष समजत असल्याबद्दल धन्यवाद. गेल्या २-३ वर्षांत काहींना बाळासाहेबांनी काढले, तर काही सोडून गेले. त्यानंतर शिवसेना संपली, उद्धव ठाकरे कारकुनी करणारा आहे, हे सगळे आरोप मी सहन केले. बाळासाहेबांचे आशीर्वाद भक्कमपणे माझ्यामागे नसते व कार्यकर्त्यांचे बळ माझ्या पाठीशी नसते, तर तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलावले नसते.
ज्याअर्थी तुमच्यावर जोरदार टीका होते, त्याअर्थी तुम्ही प्रबळ आहात?
शिवसैनिकांना अजून कोणी ओळखलेले नाही. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना दुःख दिले, त्यांना शिवसैनिक कधीही आपले समजत नाहीत. माफ करीत नाहीत.
प्रशासकीय ताकद असलेली माणसे पक्षाकडे नाहीत?
राहुल गांधींना जर पंतप्रधान म्हणून बघितले जाते, तर शिवसेनेकडे संशयाच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही.
मराठीच्या मुद्द्यावर स्थापन झालेली शिवसेना उत्तर प्रदेशमधून येणाऱ्यांचे लांगूलचालन करीत आहे. जैनधर्मीय मराठी लोकांना घरे नाकारतात. परप्रांतीयांची दंडेलशाही वाढत आहे. याकडे तुम्ही कसे पाहता?
शिवसेना आणि मराठी माणूस यांचे नाते तुटलेले नाही व तुटणार नाही. जे कोणी असे म्हणत असेल, शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला आहे, तर ते राजकीय आंधळे असतील. आम्ही मराठीसाठी लढतच आहोत आणि हिंदुत्वाचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण थोडेसे मागे गेलो, तर १९८७ ची विलेपार्ल्यातील पहिली पोटनिवडणूक अशी होती, की जी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकलेली निवडणूक होती. आम्ही गेट वे ऑफ इंडियापुढे जाऊन कोणाला बोलावत नाही, की इकडे या आणि घरे बळकावा.
भाजप हा बनियांचा पक्ष आहे. बनियांचा अजेंडा शिवसेनेवर लादला आहे का? त्यामुळे शिवसेनेचा लढाऊ बाणा दबला गेला आहे का? रस्त्यावर शिवसेनेची ऍक्शन दिसत नाही?
खासगी सुरक्षा संघटनांचा विषय असेल, तर आपण त्यांची मानगूट पकडू. त्यात परप्रांतीय का येत आहेत? मराठी माणसाने यात काम केले पाहिजे व त्या जागा भरल्या, तर परप्रांतीयांना जागा मिळणार नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज होत आहेत. खरे भूमिपुत्र ते आहेत. ते मराठी नाहीत का? ठाणे जिह्यातही कुपोषण होत आहे. तिथे सरकारी आकडेवारीनुसार २९० बालके मृत्युमुखी पडली. ते आदिवासी असले, तरी मराठी नाहीत का? त्यांना सोडून दिले आणि नुसता मराठीचा मुद्दा लावून धरला, तर काहीच होणार नाही.
नारायण राणे भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे?
मी अजूनही माणूस शोधतोय, की जो केमिस्टकडे जाऊन डोके दुखण्याची गोळी मागेल.
शिवसेना-भाजप युती तुटली, तर शिवसेना स्वबळावर सत्ता मिळवू शकते?
युती तुटेल, असे वातावरण सध्या नाही व तसे आमच्या मनातही नाही.
युतीत तणाव असताना भाजपच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युतीसाठी बैठकी झाल्या होत्या. अशा मित्रावर विश्वास ठेवून सत्ताधारी आघाडीला पराभूत करणे सोपे आहे?
एक व्यक्ती म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. आमचा जनतेवर अधिक विश्वास आहे. बाकीचे विषय गौण ठरतात. आजचा महाराष्ट्र हा गुंडागर्दीचा आहे, शेतकऱ्यांचा राहिलेला नाही, घुसखोरांचा झाला आहे. सत्ता असताना बांगलादेशींना आम्ही सरहद्दीवर नेऊन सोडत होतो. मला बॉंबस्फोटांची चिंता असून, तिकडे कोणी बघत नाही. एमआयडीसी बंद आहेत. कारखाने बंद पडत आहेत. एसईझेडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. तुम्हाला खुर्ची हवी आहे ना, मग फर्निचरच्या दुकानातून खुर्ची आणून त्यावर मुख्यमंत्री म्हणून बसा. कोणी विचारायला येणार नाही.
गोपीनाथ मुंडे अनुभवी राजकारणी आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी ते प्रयत्न करणार. हे शिवसेनेसाठी त्रासदायक नाही का?
याची उत्तरे निवडणुकीनंतरच मिळतील.
शिवसेनाप्रमुखांनी सर्वस्व मानून कोणतीच प्रशासकीय जबाबदारी स्वीकारली नाही किंवा प्रशासकीय पद स्वीकारले नाही. तुम्ही मुख्यमंत्रिपद घेणार का?
मी पंतप्रधान, मुख्यमंत्री अशी कोणतीही वैयक्तिक स्वप्ने पाहत नाही. स्वप्नांना कोणताही आधार नसतो. भलीभली माणसे स्वप्नातून कधी जागी झालीच नाहीत व अशीच संपून गेली.
महाराष्ट्र समृद्ध करावयाचा असेल, तर प्राधान्याने करावयाच्या कोणत्या बाबी आहेत?
मुलांच्या शिक्षणापासून प्रश्न सुरू होतो. चांगल्या शाळेत मुलांना प्रवेश देणे, शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयात प्रवेश आणि पदवीनंतर नोकरी मिळवून देणे, हे शहरी प्रश्न झाले. ग्रामीण भागात वीज भारनियमनाचा मोठा प्रश्न आहे. दिवसभर वीजच नसते. मुलांना घरी अभ्यास करायचा असेल, तर वीज नाही. शुभंकरोती कल्याणम्, ही आपली परंपरा आहे; पण दिवेलागणीला घरी वीज नाही.
हिंदुत्व ब्रॅंडची ताकद प्रचंड होती व केंद्रात सरकार आले. हिंदुत्वाच्या ब्रॅंडखाली आता काय कामे सुरू आहेत?
ज्या ज्या वेळी देशावर संकटे आली, त्या वेळी महाराष्ट्रातून कोणी तरी उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार अशी उदाहरणे आहेत. हिंदुहृदयसम्राट म्हणून जे देशात ओळखले जातात, ती अस्सल मराठी व्यक्ती आहे. हिंदुत्व व मराठी या गोष्टी वेगळ्या नाहीत. कॉंग्रेसने ज्या जातीपातीच्या भिंती उभ्या केल्या आहेत, त्या आता हळूहळू तुटायला लागल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी आदेश काढूनही अनेक आस्थापनांनी मराठी पाट्या बदलल्या नाहीत. शिवसेना रस्त्यावर उतरून याला उत्तर देणार की नाही?
ही जबाबदारी घ्यायला मी तयार आहेच. त्याबाबत मला लाज वाटण्याचे कारण नाही. मी शांत, संयमी आहे, असे माझ्यावर आरोप होत आहेत. हे करायला आम्ही मागेपुढे पाहत नाही; पण ज्यांना सांगून कळत नाही, त्यांना कायद्याचा बडगा आहे. प्रशासन असमर्थ ठरले, तर शिवसेना आहेच.
शिवसेनेचे किती खासदार व आमदार निवडून येतील?
जेवढ्या जागा शिवसेना लढवेल, तेवढ्या सगळ्या जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार. मी रात्रंदिवस मेहनत करीन. भगवा लोकसभा व विधानसभेवर या निवडणुकीत फडकावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
राणे यांना शिवसेनेतून काढले. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांनी जाहीर रीतीने केले. त्यांची माणसे पक्षातून गेली. या काळात मनाचा समतोल कसा टिकविला?
आमच्या कुटुंबीयांनीही माझ्यावर आरोप केले होते. असा शत्रू कोणाला लाभला नसेल. शिवसैनिकांचे ऋण मी जन्मोजन्मी विसरू शकणार नाही. शिवसेनाप्रमुख माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. मी खरा आहे की खोटा आहे, ते त्यांना माहीत आहे. त्यांनी मला खंबीरपणे सांगितले, तुझी भूमिका बरोबर आहे, एक ना एक दिवस जनता तुझ्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाहीत. संजय दत्त खलनायक म्हणून लोक विसरले होते. खलनायक म्हणून रोज वृत्तपत्रांतून माझेच नाव येत होते. पण घरातील सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखविला .
शरद पवार यांनी या काळात तुम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष साथ दिली?
शिवसेनेला जशास तसे आक्रमकपणे उत्तर द्या, असे ते गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलले आहेत. मी लहान मुलांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असे ते मध्यंतरी बोलले होते. आता शिवसेनेकडे लक्ष द्या असे सांगितले आहे.
मुंबईत छटपूजा झाली पहिजे की नाही?
यावर सर्व राजकीय पक्षांनी बोलले पाहिजे. एका पक्षाला कात्रीत पकडून चालणार नाही. याबाबत बोलताना आपण आपल्या व्यवसायापासून सुरवात केली पाहिजे. बांधकाम कंपनी असेल, तर तिथे गवंडी मराठी पाहिजे. तो बिहारी किंवा परप्रांतीय चालतो आणि मग छटपूजेला मी विरोध का करतो? यासाठी स्पष्ट भूमिका पाहिजे. विरोध करायचा असेल, तर स्वतःपासून आचरण केले पाहिजे.
----------------------------------------------------------
शिवसेना संपली, उद्धव ठाकरे कारकुनी करणारा आहे, हे सगळे आरोप मी सहन केले; परंतु आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील.
----------------------------------------------------------
No comments:
Post a Comment