हा विशेष लेख आजच्या साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त उद्धवसाहेबांनी मटा साठी लिहिला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले की तेजाचा गोळा... दरारा... करारी बाणा. मात्र याच्या उलट चित्र 'मातोश्री'मध्ये आम्ही अनुभवतो. कुटुंबवत्सल, प्रेमळ पिता, घरातल्या प्रत्येक सदस्याशी हितगुज साधणारा कुटुंबप्रमुख... असे एकापेक्षा एक अस्सल गुण आम्हाला 'मातोश्री'तल्या शिवसेनाप्रमुखांमध्ये पहायला मिळतात. आम्हा तिघा भावंडांना त्यांनी कधीही मारलं नाही. साधा हातही कधी उगारला नाही. त्यांना काय आवडते, त्यांना कशाचा राग येतो हे त्यांच्या वागण्यातूनच आम्ही ओळखायचो. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेची स्थापना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आयुष्यात सतत संघर्षालाच तोंड द्यावे लागले. तरीही, त्यांनी स्वभावात त्रागा येऊ दिला नाही. मात्र एखाद्या माणसावर अन्याय झाला की याच प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचे रुपांतर रागात होते आणि त्याचे पडसाद त्यांच्या रागापेक्षा दसपटीने अधिक उमटतात. अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शक्ती त्यांच्यात कुठून येते, हे आम्हालाही आजवर न उलगडलेलं कोडं आहे...
मी बालमोहन विद्यामंदिरमध्ये शिकायचो. आताच्या 'पालक दिना'चे 'फॅड' त्यावेळी नव्हते. मात्र व्यस्त असूनही साहेेबांचे आमचा अभ्यास, खेळातल्या कौशल्याकडे लक्ष असायचे. दादरचे आमचे जुने घर तळमजल्यावर होते. तिथेच मागच्या गॅलरीत साहेबांचा कॉम्प्रेसर आणि स्पे गन असायची. व्यंगचित्र काढताना कोणी व्यत्यय आणलेला त्यांना आवडायचे नाही. १९८५ नंतर शिवसेनेचा व्याप बराच वाढत गेल्याने व्यंगचित्रांसाठी लागणारा एकांत व मोकळा वेळ मिळणे दुरापास्त झाले आणि साहेबांनी कुंचला थांबवला. ..........
शिस्तप्रिय, काटेकोर दष्टा
साहेब जेवढे कणखर आणि निडर आहेत, तेवढेच ते हळवेही आहेत. 'माँ'च्या जाण्याने ते अधिकच हळवे बनले. आजही मी दौऱ्यावर जाताना ते मला जेवणाकडे आवर्जून लक्ष देण्यास सांगतात. 'वाटेल तसे दौरे करण्याचे आणि जेवणाकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम मला आता दिसतायत. तू तुझी काळजी घे', असाच त्यांचा सल्ला असतो. सभेच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्यांचा पहिला फोन येतो. सभा झाल्यानंतर 'कशी झाली' हेही ते आवर्जून विचारतात. परतताना सांभाळून निघ, सावकाश प्रवास कर, अशा सूचना करतात. 'माँ' गेल्यानंतर ते वडिलांबरोबरच आईचीही भूमिका बजावताहेत. साहेबांनी आम्ही तिघा भावंडांना खूपच प्रेम दिले. मात्र नातवंडांवरचे त्यांचे प्रेम पाहून आम्हालाही हेवा वाटतो. आजोबा आणि नातवंडांच्या बऱ्याच गप्पा रंगतात. साहेबांसारखाच तेजसलाही प्राण्यांविषयी खूप जिव्हाळा असल्याने त्यांचेही चांगलेच सूत जमलेय. साहेबांना प्राण्यांचा खूपच लळा. दादरला असताना आमच्याकडे मार्शल नावाचा ग्रेट डेन जातीचा कुत्रा होता. त्याला फिरवायला साहेब शिवाजी पार्कात जायचे.
साहेब अतिशय शिस्तप्रिय. टापटीपपणा हवाच. बैठकीसमोरचा टीपॉय व त्यावरच्या वस्तू त्यांना व्यवस्थित ठेवलेल्या लागत. झुरळ सरळ चालले तर त्याला साहेब सोडतील, पण ते तिरके चालले तर चपलेने फटकारतील, असे प्रमोद नवलकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले होते. हे उदाहरण फारच बोलके आहे. हा झाला गंमतीचा भाग, पण ते दैनंदिन जीवनातही फार काटेकोरपणे वागतात. दिलेली वेळ चुकवणे त्यांना खपत नसे. ठरलेल्या वेेळेआधी आपण एखाद्या ठिकाणी जातोय असे दिसले तर ते गाडी हळू करायला सांगत.
शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण तसे कमीच. सभा, दौरे सोडले तर स्वत:साठी फिरणं जवळजवळ नाहीच. 'माँ'च्या इच्छेखातर त्यांनी कर्जतला फार्म हाऊस बांधले. तेथे ते अधूनमधून जायचे. पण 'माँ'च्या निधनानंतर गेली कित्येक वषेर् ते तिथे गेलेलेच नाहीत. आतापर्यंत साहेबांनी एकदाच परदेश दौरा केलाय आणि तोही डिस्ने लँड पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. १९८० सालची ती गोष्ट. योगायोग म्हणजे त्यावेळी डिस्नेलँडचा रौप्यमहोत्सव होता. तेथे स्थानिक व्यंगचित्रकार आपले पटकन व्यंगचित्र काढून देतात. अशाच एकाची फिरकी घेण्याची साहेबांना लहर आली आणि त्याचाच कुंचला-कागद घेऊन साहेबांनी त्याचेच व्यंगचित्र काढून दिले! सध्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच व्यंगचित्रकार असून त्यातही लाजवाब राजकीय व्यंगचित्रे रेखाटणारा शिवसेनाप्रमुखांशिवाय दुसरा कोणी व्यंगचित्रकार असेल, असे मला तरी वाटत नाही.
साहेबांना 'फोटोसेशन'साठी तयार करणे हेही जिकीरीचे काम असे. एकदा गोव्याला असताना समुदाच्या पार्श्वभूमीवर साहेबांचे फोटो काढण्याचा मला मूड आला. पण साहेब समुदावर यायला उत्सुक नव्हते. 'चला तर खरं, इथल्या किनाऱ्याचे वेगळेपण तरी बघा', असे सांगत मी त्यांना तयार केले. हॉटेलच्या बग्गीतून साहेब किनाऱ्याजवळ आले. पण पाण्यात जायला तयार होईनात. शेवटी इथली वाळू बघा किती वेगळी आहे असे सांगत मी त्यांना पाण्यापाशी घेऊन आलो. 'काय आहे वेगळे?' असे म्हणत साहेबांनी दोन्ही हात आडवे पसरले आणि मी कॅमेरा क्लिक केला. विस्तीर्ण सागराच्या दिशेने बाहू पसरून उभे असलेल्या साहेबांचा तो फोटो माझ्या आवडत्या फोटोंपैकी एक आहे.
साहेबांना छंद असे फारसे नाहीत. क्रिकेटवर मात्र त्यांचं निस्सिम प्रेम. चित्रपटांचं बोलाल तर आम्ही सर्वांनी मिळून थिएटरमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा होता 'सरकार'! आजही त्यांच्या उशाला पु. ल. देशपांडे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या कथाकथनाच्या कॅसेट्स असतात. वारंवार ऐकून त्या साहेबांच्या अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. बागकामाचीही त्यांना फार आवड. डॉ. बालाजी तांबे यांच्याकडे उपचारासाठी असताना साहेबांनी तर त्यांची बाग जवळजवळ नव्यानेच सजवून दिली होती. फार पूवीर् कधीतरी त्यांना एखादी डीश करायचा मूड येई. पण तिची 'रेसिपी' त्यांचीच असे!
कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याचा बाळासाहेबांचा स्वभाव आहे. घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असतात. प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहणारे अनेक आहेत, मात्र प्रवाहाला थोपवून त्याचा मार्ग बदलण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये पहायला मिळते. शिवसेना बाळासाहेबांना जीवापेक्षाही प्यारी आहे. शिवसैनिक जसे बाळासाहेबांना पहायला वेडे असतात, तसेच बाळासाहेबही त्यांना पहायला वेडे असतात. दौऱ्यात रात्री अपरात्री प्रवास करायचा नाही, अशा खास शिवसैनिकांना साहेबांच्या सूचना असतात. दौऱ्यात शिवसैनिकाला दुखापत झाली की साहेब ताबडतोब होमियोपॅथीचे औषध द्यायचे. त्यांच्या घरच्यांचीही ते तेवढ्याच आस्थेने चौकशी करीत असतात. आजही दौऱ्यानंतर शिवसैनिक सुखरूप परतल्याची चौकशी ते माझ्याकडे करत असतात. शिवसैनिक हा आपल्या परिवारापैकीच एक आहे, असे ते मानतात. शिवसेनेसाठी बाळासाहेबांनी स्वत:च्या जिवाला कायमचा धोका पत्करला आहे.
घरी असले तरी आजही साहेब बदलत्या जगाच्या अपडेट्स ठेवून आहेत. ओबामांचा शपथविधीही त्यांनी संपूर्ण पाहिला. त्याआधी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळीही ते टीव्हीसमोर बसून होते. ती दृश्ये बघताना ते संतापाने धगधगत होते. या हल्ल्यानंतर आपल्या सरकारने पाकिस्तानबरोबरचा क्रिकेट दौरा रद्द केला. त्या देशाबरोबरचे संबध तोडून आता कारवाई... प्रसंगी युद्धाची भाषा केली जातेय. मग साहेब त्यावेळी वेगळं काय सांगत होते? बांगलादेशी लोंढे आवरले पाहिजेत असे सध्याचे गृहमंत्री चिदंबरम आता बोलतायत. साहेब हे केव्हाच म्हणाले होते!..
बाळासाहेब दष्टे आहेत ते असे.
No comments:
Post a Comment