शिवसेनेने अमराठी लोकांना खासदार करण्यापासून ते मराठी भारतकुमार राऊत आणि निलम गोऱ्हेपर्यंत घसरले. मुळात आज त्यांची गाडी रुळावरून चालतच नव्हती. पत्रकारांनी टाकलेल्या बाऊंसर वर अक्षरश: लोटांगण घातले. तेच तेच रटाळ बोलताना काही खऱ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या. माझे आमदार विधानसभेत आले पाहिजेत म्हणुन कॉंग्रेसला मदत केल्याचे सुद्धा सांगितले. तसेच महानगरपालिकेत सपा शिवसेनेला मदत कशी करते हे सुद्धा सांगायला विसरले नाही.
मुळात यांचे आमदार निलंबीत झालेच का? सर्व मराठी माणसांना माहिती आहे. त्याचा बराचसा गाजावाजा खुद्द राज ठाकरे यांनीच केला आहे. मराठी अस्मितेसाठी माझे आमदार हौतात्म्य सुद्धा पत्करायला तयार आहेत, मग परवा काय तुमच्या या आमदारांच्या मांजरी झाल्या का? लोकांच्या कामांची इतकी काळजी तुम्हाला त्यावेळी होती का? ज्या मराठी माणसांनी तुमच्या आमदारांना निवडून दिले त्या मराठी माणसांच्या मताची जाणिव तेव्हा नाही झाली? मुळात आता तर ते प्रकरण सुद्धा बनाव वाटायला लागले आहे. तु मारल्यासारखा कर मी लागल्यासारखा करतो. हिच तुमची भूमिका. मराठी अस्मितेच्या नावाने प्रचंड प्रसिद्धी कमवायची आणि
मराठी माणसालाच फाट्यावर मारायचे हे तुमचे उद्योग काही नविन नाहीत.
परवाच्या विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेचा एक आमदार हरला याचे दु:ख नक्कीच आहे. एक आमदार शिवसेनेसाठी अतिशय महत्वाचा होता. पण ते होऊ शकले नाही. यासाठी तुमचा मनसे पक्ष जबाबदार आहे असे मुळीच म्हणणे नाही. तुमचा स्वत:चा पक्ष आहे काय निर्णय घ्यायचे याचाही तुम्हाला अधिकार आहे. पण प्रत्येल वेळेस जे तुम्ही म्हणायचात की या सगळ्या युती-आघाड्यांसारखे मला राजकारण करायचे नाही. माझा पक्ष यांच्यापेक्षा वेगळा आहे. आता तुमचे काय म्हणणे आहे? ते तुम्ही लोकांना सांगितलातच नाहीत. खरेतर आजच्या पत्रकार परिषद हि तुमच्या शिवसेना काविळीचे एक उदाहरणच आहे. शिवसेनेला पराभव पचवता येत नसेलही पण ज्या मराठी मातीशी कॉंग्रेस सतत बेईमानाने वागते त्यांच्या कळपात जाऊन तुम्ही काय मोठे काम केलेत हो?
विधानपरिषदेत यापूर्वी अनेक मोठे लोक बिनविरोध निवडून जायचे. लेखक, कवी, गायक आणि इतर वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोक याच सभागृहाचे आमदार झालेले आहेत. पण आजच्या खाव सुटलेल्या जमान्यात ते चित्र दिसणे केवळ अशक्य आहे. पैशाच्या थैली समोर टाकल्या की राजकारणात सगळे काही मिळते. अशा प्रकारच्या निवडणूकीत घोडेबाजार (की गाढव) होतो हे सगळ्यांना माहित आहे. तरीही राज ठाकरे म्हणत आहेत की केवळ चार आमदारांचे निलंबन रद्द व्हावे यासाठी आम्हि आघाडीला मतदान केले. पण परवाच तुमचे गटनेते टीव्ही वर हेच सांगायला का कचरत होते?
राज ठाकरे आज तुम्हीच जगासमोर उघडे झाला आहात! सर्वजण असेच समजत होते की तुम्ही काहितरी वेगळे करत आहात? अर्थात ती गैरसमज दुर तुम्हीच आज केलात ते बरे झाले. शिवसेनेवर टिका केल्यामुळे तुमचा पक्ष एवढा मोठा होऊ शकते म्हणजेच शिवसेनेला किती महत्व आहे तेच बघा. तुम्ही स्वत: आज ज्या उड्या मारत आहात त्या सुद्धा शिवसेनेमुळेच! आज उद्धवसाहेबांनी सांगितलेच आहे जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा!


