Sunday, 13 September 2009

उघडा डोळे बघा नीट!

आजकाल मिडीयामध्ये सर्वाधिक चर्चा कुठल्याविषयावर होत असे तर ती राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या बिघाडीबद्दल. वेगवेगळी मंडळी आपल्या मनात येईल तशी प्रतिक्रिया देऊन आपले घोडे दामटवण्याचे काम करत आहेत. पण प्रश्न आहे लोकांचा, लोकांना काय हवेय? महाराष्ट्राच्या साडे आठ कोटी जनतेला या आघाडी वाल्यांना एक एक करून मारायचेय की दोघांना एकत्रच हा उरला आहे.

गेली १० वर्षे महाराष्ट्राला उतरती कळा लागलेली आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळातील काही महत्वाकांक्षी प्रकल्प सोडल्यास यांनी काय केले हे जनतेला माहित नाही. सतत गरीबी हटावचे नारे देऊन वेगवेगळे नेत्यांची प्रत्येक वेळी गरीबी जोमाने हटली परंतु सर्वसामान्य माणसाला काय मिळाले याचे उत्तर कुणाकडेच नाही. शेतकरी आत्महत्या, महागाई, भ्रष्ट्राचार, जामिनी घोटाळे, गहू घोटाळे हे सगळे या १० वर्षात जनतेने पाहिले. प्रत्यक्षात काहीही न करता निवडणूकीच्या तोंडावर घोषणांचा पाऊस पाडणे हे एकमेव काम या लोकांनी केलेल आहे आणि निवडणूकांनंतर या सगळ्या घोषणा म्हणजे प्रिंटींग मिस्टेक म्हणून बोलायलाही हे कमी नाहीत. कुणाचे हे दुर्दैव?

’जसा राजा तशी प्रजा’ असे म्हटले जाते. मग आपण काय समजायचे? की प्रजाच तशी आहे म्हणून असे राज्यकर्ते मिळाले का? तर नाही. जनतेने कुठेतरी प्रगती होईल, शिवसेना-भाजप युतीच्या कामांपासून धडा घेऊन हे कॉंग्रेसवाले काहीतरी करतील म्हणून नाही तर आमच्याच सर्वसामान्य मराठी माणसाने मला काय त्याचे दुसरे आहेत ना असा विचार करून निवडणूकीच्या वेळेस मतदान न केल्यामुळे हे घडले. १० वर्षे महाराष्ट्राच्या बोडक्यावर हे बिघाडी शासन आले.

परवा केंद्रसरकारने खर्च कपातीचा निर्णय म्हणून परदेशी जाणाऱ्या मंत्र्यांना बिजनेस क्लास ऐवजी इकॉनॉमीकल क्लास ने प्रवास करण्याची विनंती केली. तिथे आमचा "अजाणता राजा" भडकला. म्हणतो कसा की मला प्लेन मध्ये काम करायचे असते फाईल बघायच्या असतात तर हे सगळे काम इकॉनॉमी क्लास मध्ये कसे होणार? केवढा हा गंभीर प्रश्न! या अजाणत्या राजाला ऑफिस मध्ये बीसीसीआयचे एवढे काम असते की वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून विमानामध्ये बसून जनतेची काम करतो. (काय करणार तेवढाच वेळ जनतेसाठी देता येते म्हणून तर एवढ्या आत्महत्या झाल्या त्या कळल्या नाहीत).

पुन्हा निवडणुका आल्यात जनतेला पाच वर्षातून एकदाच यांना धडा शिकवण्याची संधी मिळते त्या संधीचे सोने केले तर भविष्य नक्कीच चांगले आहे. पण जर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले तर काही खरे नाही. उगाच स्वत:चे डोके आपटत बसण्यापेक्षा या आघाडीवाल्यांनाच का आपटत नाही?

No comments:

Post a Comment