Monday 9 August, 2010

'आता बस्स...एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू'

खालील लेख हा इसकाळ मधून घेतला आहे. हाच लेख इसकाळवरुन वाचण्यासाठी इथे क्लिक करा!


"आता बस्स झाले. खूप अन्याय सहन केला. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राची भूमी परत मिळविण्यासाठी आता एकत्र येवू या..,एकीची वज्रमुठ करुन इतिहास घडवू' या असे कळकळीचे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) येथे केले. 

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हजारो सीमाबांधवाच्या उपस्थीत येथील पेटाळा मैदानावर झालेल्या विराट सभेत निर्णायक लढ्याचे रणशिंग श्री ठाकरे यांनी परिषदेत फुंकले. यावेळी जमलेल्या हजारो सीमाबांधवांनी त्यांना साथ देण्याचा नारा दिला. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. या इतिहासात आपल्याला करंटे नामर्द असे हिणवून घ्यायचे नसेल, तर दुही संपवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. आपण यासाठी एकत्र येवून शेवटपर्यंत लढू या अशी शपथ श्री ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी दक्षिण महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काहीशा मरगळलेल्या सीमालढ्याला या परिषदेने पुन्हा एक नवचैतन्य दिले.

हक्क असून अन्याय सहन करणे दुर्देवी असल्याचे सांगत श्री. ठाकरे म्हणाले,"" दिल्लीतील नामर्द केंद्र सरकार काहीही करु शकत नाही. केंद्रात गेलेले मुर्दाड खासदार दिल्लीत जावून मुडद्यासारखे वागताहेत. त्यांना जागे करण्याची गरज आहे. सीमाभागातील मराठी बांधवावर अन्याय करणाऱ्या कन्नडीगांना असा टोला द्या की त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनाप्रमुखांनी आदेश दिल्यास आम्ही बेळगाव कशाला बेंगलोर, दिल्लीलाही या प्रश्‍नी धडक मारु अशी घोषणा श्री ठाकरे यांनी यावेळी केली. शौर्याचा आव आणणारे राज्य सरकार शेतकऱ्यांना दंडुके देते. त्यांच्यावर बेसुमार लाठीमार केला जातो. पण याच सरकारची दंडुके; मात्र दिल्लीत गेल्यानंतर त्याच्या शेपट्या होतात. अशी टीकाही श्री ठाकरे यांनी केली.


केंद्रसरकारवरही टीकेची झोड उठविताना श्री ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारला तेलगू भाषा कळते. पण मराठी कळत नाहीत. ज्या भागात अस्सलिखीतपणे मराठी बोलले जाते. कानडीचा स्पर्शही नाही या मराठी बांधवांना जबरदस्तीने कर्नाटकात ढकलायचा डाव सुरु आहे. हे सहन करुन घेणार नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री हा भाग द्यायला विरोध करतात आणि मुंबईत येवून उद्योजकांना कर्नाटकात येण्याची गळ घालतात, त्यावेळी "त्या" मुख्यमंत्र्यांना शिवसेनेनेच जाब विचारला प्रत्येक वेळेला शिवसेनाच आंदोलन करते. आणि हे सरकार मात्र दुर्लक्ष करते. संसदेत शिवसेनेच्या खासदारांनीच आवाज उठवायचा बाकीचे खासदार करतात काय असा सवालही श्री ठाकरे यांनी येथे केला. आजची तरुण पिढीही अपेक्षेने आपल्याकडे महाराष्ट्रात येण्याची विनंती करीत आहे. सीमाभागातील आक्रोश तुम्हाला ऐकू येवू दे, त्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी तुमच्या खुर्च्यांचा उपयोग करा असा सल्ला श्री ठाकरे यांनी यावेळी दिला. 
शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर, आमदार दिवाकर रावते,आमदार चंद्रदीप नरके, सुजीत मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदिंनी संयोजन केले. कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

किरण ठाकूरांना गप्प बसविले...
बेळगावच्या तरुण भारचे संपादक किरण ठाकूर यांना आज सीमा वासियांच्या प्रचंडरोषास सामोरे जावे लागले. या परिषदेत ते बोलण्यासाठी उभे राहताच त्यांना एक शब्दही बोलू न देता, खाली बसविले गेले. सीमा चळवळीत फूट पाडून स्वतःचे वर्चस्व ठाकूर निर्माण करत असल्याची टीका अनेकांनी केरून संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच परिषदेतील ठराव मांडत असतानाही किरण ठाकूर सोडून सर्व मंजूर अशी घोषणाबाजी झाली. 


परिषदेत काही ठराव मंजूर करण्यात आले. ते असे
१) महाराष्ट्राने एक नोव्हेंबर २०१० हा दिन काळा दिन म्हणून राज्य भर पाळावा. या दिवशी महाराष्ट्र बंद ठेवून या प्रश्‍नांची जाण करुन द्यावी.
२) शिवसेनेच्या पुढाकाराने सुरु झालेल्या या लढ्यात किमान पाच लाख मराठी बांधव सहभागी होतील असे प्रयत्न करावेत.
३) कर्नाटकी पोलिस मराठी बांधवावर अन्याय करीत आहे. हे रोखण्यासाठी केंद्रीय पोलिस पथक सीमाभागात ठेवावे.
४) सरकारी पत्रके, शेतकऱ्यांचे सातबारे व अन्य कागदपत्रे मराठी भाषेत देण्यात यावीत. तसा आग्रह केंद्राने करावा
५) शिवसेना संसदीय समिती स्थापन करावी
६) शिवसेना खासदारांनी बैठका घेवून महाराष्ट्रातील इतर पक्षाच्या खासदारांना हा प्रश्‍न समजावून सांगावा. व त्यांना लढण्यास प्रवृत्त करावे
७) केंद्राच्या अन्यायी भूमिकेचा या परिषदेत निषेध करावा. 

No comments:

Post a Comment