Sunday 20 January, 2008

एक शांत वादळ!

सुचना : हा लेख दि. २० जाने. २००८ च्या ई-सकाळ.कॉम वरून घेतला आहे. मुळ लेखक जे. डी. पाटील आहेत.

तो काळ होता १९८५-८६ चा. त्या वेळी "मुंबई सकाळ'चे कार्यालय आणि प्रिंटिंग प्रेस प्रभादेवी येथे होती. शिवसेनेचे व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक'ची छपाईही तेथेच होत होती. अनेकदा तेथे "मार्मिक'ची छपाई सुरू असताना हाताची घडी घालून उभे असलेले उद्धव ठाकरे दृष्टीस पडत. याच काळात महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती. पण आपण शिवसेनेसारख्या एका लढाऊ संघटनेच्या प्रमुखांचे, शिवसेनाप्रमुखांचे पुत्र आहोत, असा दर्प उद्धव ठाकरे यांच्या वागण्यात अजिबात नसे. त्यांच्याबरोबर कधीही कार्यकर्त्यांचा गोतावळा नसायचा. बहुसंख्य वेळा ते एकटेच असायचे. शिवसेनेच्या राजकारणापासून चार हात अंतर राखूनच ते वावरताहेत हे त्यावेळी स्पष्ट दिसत असे. "सकाळ' कार्यालयापासून जवळच असलेल्या बंगाल केमिकलच्या समोर "आकार' नावाचे कार्यालय होते. या कार्यालयात डिझाईनचे काम चालत असे. तेथेही ते नेहमीच दृष्टीस पडत. त्या वेळी कोणी भाकित केले असते, की शिवसेनाप्रमुखांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे असतील, तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. त्यांच्यातील ती नम्रता, साधेपणा, राजकारणापासून दूर राहणे यामुळे ते चित्रकार, छायाचित्रकार अशाच एखाद्या कलेतच रममाण होतील, त्यांच्या शांत स्वभावी प्रकृतीला राजकारण मानवणार नाही, असेच वाटत होते. पण पाच वर्षांपूर्वी महाबळेश्‍वर येथील शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. आणि त्यांच्याबद्दलचे सगळे आडाखे फोल ठरले. त्यानंतरच्या पाच वर्षांतही नेतृत्वगुणाच्या कसोटीवर ते ज्या प्रकारे उतरले, अनेक संकटांतही शिवसेनेचा रथ पुढे नेताना जी संयमी वृत्ती बाळगली हे सर्व राजकारणाच्या अभ्यासकांनाही अचंबित करणारे होते.

उद्धव ठाकरे यांचे पाच वर्षांपूर्वी कार्य ाध्यक्षपदासाठी सूचक म्हणून राज ठाकरे होते, तर अनुमोदक नारायण राणे होते. आज हे दोघेही शिवसेनेत नाहीत. तरीही मुंबई महापालिकेवर शिवसेना युतीची सत्ता आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप सत्तेवर येण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर खासगीत उद्धव यांच्या नेतृत्त्व कसे दुबळे आहे, याबाबत कुजबुज होऊ लागली. पक्षात काहीतरी शिजत असल्याची कुणकुण लागताच त्यांनी हा डाव अत्यंत शांतपणे उलटविण्याचे ठरविले. उद्धव यांच्या सान्निध्यातील सहकारी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याबद्दल बोलताना सांगतात, की त्यांनी एकदा ठरविले की ते तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. एखाद्या घटनेबद्दल सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात. पण आपल्याला वाटते तेच अखेर करतात. हे करताना कोणतीही आदळआपट नसते. कोणालाही भाषणात शिव्याशाप नसतात. अत्यंत संयमाने ते परिस्थिती हाताळतात. राणे यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांतच (३ जुलै २००५) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: राणे यांच्या हकालपट्टीची घोषणा केली; मात्र त्यानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाचे भांडवल करून राणे यांनी शिवसेनेवर, विशेषतः उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला. जाहीर सभांमधील भाषणांतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर बेछूट आरोपांचा सपाटाच लावला. राणे यांच्या आक्रमक वृत्तीवर कोकणी माणूस काहीसा विचलित झाला.

जो परंपरागत शिवसेनेचा होता. त्याचा फटका मालवण पोटनिवडणुकीत आला. तिथे शिवसेना उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यानंतर कोकणातील राणे समर्थक आमदारांच्या जागाही शिवसेनेच्या हातून गेल्या. श्रीवर्धन विधानसभेची जागा शिवसेनेने जिंकल्याने राणे यांच्या घोडदौडीला काहीसा लगाम बसला. राणेंच्या बंडाचा अनुभव पाठीशी असलेल्या उद्धव यांनी मात्र नंतर त्यापाठोपाठ झालेले राज ठाकरे यांचे बंड अगदी पद्धतशीरपणे हाताळले. राज ठाकरे यांनी थेट "विठ्ठला'भोवतीच्या कोंडाळ्यावर तोफ डागत केलेले आरोपही गंभीर होते. राज यांनी पक्षात नेतेपदावर असताना जाहीरपणे केलेले आरोप पक्षशिस्तीला तडा देणारे होते; तरीही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले होते. उद्धव यांनी त्यांची हकालपट्टी तर सोडाच पण साध्या कारवाईसंदर्भातही सूतोवाच केले नव्हते. राज ठाकरे यांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी मोकळे सोडण्यात आले होते; मात्र त्याच वेळी "मातोश्री'चे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले आहेत, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्‍त करून राज यांना राजकीय चक्रव्युहात घेरले. अखेर १८ डिसेंबर २००५ चा दिवस उजाडला. राज ठाकरे यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत आपल्या नव्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राणेंना मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा जास्त प्रमाणात ती राज ठाकरे यांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती; तरी तसे घडले नाही. उद्धव यांच्या "राज'नीतीमुळे राज ठाकरे अपयशी ठरल्याचे मानले जाते. उद्धव ठाकरेंकडून याच "राज'नीतीचा प्रयोग भाजपवर करण्यात आला होता. राष्ट्रपतिपदासाठी भाजपपुरस्कृत अपक्ष उमेदवार भैरोसिंग शेखावत यांना डावलून संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्या प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे व प्रदेशाध
्यक्ष नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवर जहाल प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या; मात्र त्यामुळे विचलीत न होता उद्धव यांनी अत्यंत संयमी भूमिका घेत आमचे युतीचे घर तुटणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. युतीच्या भवितव्याच्या निर्णयाचे अधिकार त्यांनी संपूर्णपणे भाजप नेत्यांनाच बहाल केले. युती तुटल्याचे पाप आपल्या माथी नको आणि युती तुटलीच तर तो मित्रपक्षाने घेतलेला निर्णय आहे, असे खा पर भाजपवर फोडणे सुलभ असल्याची नीती अवलंबिली. प्रतिभाताईंना पाठिंबा देऊन मराठी माणसांची मने जिंकून शिवसेनेने राज्यात भाजपच्या पुढे पाऊल टाकले. राष्ट्रपती निवडणुकीनंतर युतीसंदर्भात निर्णय घेऊ, अशी घोषणा मुंडे आणि गडकरी यांनी त्या वेळी केली होती. राणे व राज यांनी केलेल्या हल्ल्यापाठोपाठ भाजपच्या नाराजीलाही तेवढ्याच समर्थपणे त्यांनी तोंड दिले. त्यानंतर उद्धव यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर मात करीत थेट दिल्लीत जाऊन लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. त्यावरही टीका झाली. आजपर्यंत शिवसेनाप्रमुखांना भेटायला लालकृष्ण अडवानी मुंबईत येत असत. यावेळी मात्र शिवसेनेने भाजपपुढे लोटांगण घातले येथपर्यंत टीका झाली. पण उद्धव यांनी कसबी राजकारण्याप्रमाणे खेळलेला तो डाव होता. तो त्यांनी जिंकला. पुढे अडवानी यांनी स्वतः मुंबईत येऊन शिवसेनाप्रमुख व उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने सर्वच विरोधकांची तोंडे बंद झाली. युती अबाधित राहिली. शिवसेना-भाजप महापालिका सत्तेवर आली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सर्वच पक्षांनी तोंडाला पाने पुसल्यामुळे राजकीय पक्षांबद्दल त्यांच्या कमालीची नाराजी आहे. असे असूनही उद्धव ठाकरे यांच्या शेतकरी मेळाव्यासाठी मिळत असलेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. एका कलाकारातून राजकारणातही उतरलेले कलागुण येत्या काळात सर्व पक्षाच्या नेत्यांना विचार करायला लावणारे आहे.

No comments:

Post a Comment